- परिसरातील नागरिकांच्या आरोग्य समस्या आणखी वाढणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२२) :- खडकी व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परिसरात जमा होणारा कचरा यापुढे पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या मोशी डेपोत टाकला जाणार आहे. महापालिका हद्दीबाहेरील या दोन्ही बोर्डाचा दररोजचा ३० टन कचरा स्वीकारण्यास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी बुधवारी (दि. ३) मान्यता दिली आहे.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कचरा संत तुकाराममनगर येथील कलासागर हॉटेलमागील बोर्डाच्या मालकीच्या डेपोत जमा केला जातो. तर, देहरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कचरा निगडीतील सेक्टर क्रमांक २२ येथे टाकला जातो. या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. विनाप्रकिया कचरा जमा केला जात असल्याने कचऱ्याला आग लागते. तसेच, कचऱ्याची दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. नागरिकांना श्वसनाचे विकार होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी व विविध सामाजिक संस्थांनी पालिकेकडे केली आहे.
देहरोड बोर्डाने त्यांचा कचरा मोशी कचरा डेपोत स्वीकारावा, असे पत्र पालिकेस १० जून २०२२ ला दिले आहे. तसेच, सद्यस्थितीत खडकी व देहूरोड बोर्डाकडे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. आवश्यक यंत्रणा तयार होईपर्यंत पालिका मोशी डेपोत दोन्ही बोर्डाचा कचरा स्वीकारणार आहे. मोशी कचरा डेपोपर्यंत कचरा वाहतुकीसाठी दोन्ही बोर्ड खर्च करणार आहेत. कचराऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिका प्रतिटन ५०४ रूपये शुल्क आकारणार आहे. हद्दीबाहेरील कचरा स्वीकारण्यास आयुक्त पाटील यांनी सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली आहे.
















