- पालिकेकडून ३ लाख झेंड्यांची खरेदी; फक्त २४ रुपयात मिळतोय तिरंगा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने ३ लाख तिरंगा झेंडे खरेदी करण्यात येत आहेत. ते कापडी झेंडे गुजरात राज्यात तयार केले जात असून, देशभरातून मोठी मागणी असल्याने त्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. झेंडे मिळविण्यासाठी पालिका प्रशासनाला धावाधाव करावी लागली. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘ घरोघरी तिरंग ‘ हा उपक्रम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पालिका ३ लाख झेंडे खरेदी करून ते नागरिकांना अल्प दरात विकणार आहे. ते झेंडे १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस घरावर लावली जाणार आहेत.
पालिकेने २० इंच बाय ३० इंच आकाराचे कापडी ३ लाख झेंडे खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. लघुत्तम पुरवठादार २४ रूपये दराने झेंडे पालिकेस उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी ७२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. कापडी झेंडे तयार करण्याचे कारखाने गुजरात राज्यात आहेत. देशभरातून कापडी झेंड्यासाठी मोठी मागणी अचानक वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत झेंड्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनालाही झेंड्यांसाठी धावाधाव करावी लागत होती. मात्र पालिकेच्या सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये बुधवारपासून (दि. ३) झेंड्यांची विक्री सुरू झाली आहे. नागरिकांसाठी २४ रूपये दराने कापडी झेंडा उपलब्ध करण्यात आला आहे. नागरिकांनी तेथूनच झेंडा खरेदी करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
शहरातील ३ लाख घरांवर तिरंगा फडकविण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चळवळीत नागरिक, शाळा, महाविद्यालय, विरंगुळा केंद्र, पर्यावरण प्रेमी, सामाजिक संस्था, सामाजिक व राजकीय संघटना, हाऊसिंग सोसायट्यांचा सहभाग वाढवावा. देश प्रेमाची भावना निर्माण करून प्रोत्साहित करण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जनजागृतीसाठी शहरात ३२ ठिकाणी फ्लेक्स लावण्यात येणार आहेत.
















