न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२२) :- शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली. मात्र तब्बल तीन वर्षांनंतर पुन्हा स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये शहरामध्ये १४ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली, तर दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वसामान्यांसह वैद्यकीय विभागाचीही चिंता वाढली.
शुक्रवारी (दि. ५) एका दिवसामध्ये ३३१९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीव्र थंडी तापाचे ४१२ रुग्ण रुग्णालयामध्ये भरती झाले आहे. त्यापैकी सहा जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरामध्ये २०१९ मध्ये स्वाइन फ्लूची लागण झाली, त्यावेळी स्वाइन फ्लूची लस आणि टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे मोठ्या प्रमाणावर वाटप केले. त्यामुळे स्वाइन फ्लू आटोक्यात आला होता. मात्र आता पुन्हा त्याने डोके वर काढले आहे.
शहरामध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून थंडी – तापांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. जुलै महिन्यामध्ये ५०३ डेंग्यूचे संशयित आढळले, तर ३७ जणांना डेंग्यू झाला. चिकनगुनियाचे पाच संशयित तर ९२७१ जणांना मलेरियासदृश आजार होता. साथीचे हे आजार वाढलेले असताना आता त्यामध्ये स्वाइन फ्लूची भर पडली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये १४ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली तर १८ जण संशयित आहेत.