- पवना धरण लवकरच शंभर टक्के भरणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२२) :- केरळ किनारपट्टीलगत द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने राज्याच्या बहुतांश भागात पुढील काही दिवस जोरधारा कोसळतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यासह पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातदेखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता आहे.
गेल्या काही दिवसापासून मावळ परिसरात पावसाने ओढ दिल्याने पवना धरण पूर्णपणे भरलेले नाही. आतापर्यंत १६६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणात ८१.४७ टक्के इतका पाणीसाठा आहे.
जुलैमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापर्यंत जोरदार बरसलेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या सर्वच भागातून गायब झाला होता. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढला होता. मात्र, सध्या मोसमी पावसाला सक्रिय होण्यासाठी पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुसार पुढील आठवडाभर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. त्यामुळे पवना धरण काठोकाठ भरून शहरवासियांसह मावळातील शेतकरी वर्ग देखील सुखावणार आहे.