न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी तीन ते पाच मिनिटांचे व्हिडिओ बनवण्यात येणार आहेत.
ठिकठिकाणी स्वच्छ भारत मिशन, माझी वसुंधरा अभियान, वॉटर प्लस असे उपक्रम राबवण्यात येत आहेत. स्वच्छतागृह उपक्रमामध्ये घनकचरा व्यवस्थापनांतर्गत सुका व ओला कचरा वर्गीकरण, चौक सुशोभीकरण, मैला शुद्धीकरण केंद्रामधील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे, पर्यावरणपूरक भिंती रंगवणे असे उपक्रम राबवण्यात येत आहेत. महापालिकेच्या वतीने शहरामध्ये या उपक्रमांची माहिती राष्ट्रीय स्तरावर होण्यासाठी त्याचे व्हिडिओ तयार करून प्रसिद्ध करण्यातयेणार आहेत. त्यासाठी तब्बल आठ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
व्हिडिओ बनवण्यासाठी मेसर्स कोटिल्य मल्टिक्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेने यापूर्वी जनजागृतीपर व्हिडिओ तयार केले आहेत. या संस्थेला ७ लाख ९६ हजार देण्यात येणार आहेत. त्यास आयुक्त पाटील यांनी मान्यता दिली आहे.