न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२२) :- एका वर्षासाठी तडीपार केलेला गुंडाने कायदा मोडून शहरात प्रवेश केला होता. त्याला आवाज देऊन घराबाहेर बोलण्यासाठी आरोपींनी एकाला पाठविले. तो आला असता आरोपी व त्याच्या मित्रांनी त्याला बोलण्यात गुंतवले. जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी चाकू व कोयत्याने तडीपार गुंडावर वार करण्यास सुरुवात केली.
शिवगाळ करत ” आम्ही तुला जिवंत सोडणार नाही ” म्हणत कोयत्याने डोक्यावर व छातीवर वार केले. तडीपार गुंड तेथून पळत जात होता मात्र चिखलाने पाय घसरून तो खाली पडला. तेथे जाऊनही आरोपींनी त्याच्यावर पुन्हा वार केले. रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार (वय २४ रा. ताथवडे) असे हल्ला झालेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. त्याच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
गणेश नितीन शेळके (वय २४ रा. ताथवडे), आदित्य रमेश चांदणे (वय २३ रा. ताथवडे), धनंजय महेश दाखले (वय २४), अनिकेत शिंदे उर्फ मोण्या (वय २०) यांच्यावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून गणेश याला पोलिसांनी अटक केली आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















