- आदर्श शाळा आणि बालवाडीताई यांनाही पुरस्कार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२२) : – पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण विभागाकडून २४ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यामध्ये महापालिका शाळांतील २० तर, खासगी शाळांतील ४ शिक्षकांचा समावेश आहे. तर, ६ आदर्श शाळांना पुरस्कार देण्यात येणार आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ५ तारखेला सकाळी १० वाजता पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
आज ५ तारखेला शिक्षक दिनानिमित्त शाळांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे महापालिका शाळांतील शिक्षकदिन ६ तारखेला होणार आहे. खासगी शाळांमध्ये मात्र, ५ तारखेला शिक्षकदिनाची सुट्टी नसल्याने त्या शाळांमध्ये ५ तारखेलाच शिक्षक दिन साजरा होईल. महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या ६ आदर्श शाळा पुरस्कारांमध्ये २ विशेष पुरस्कृत शाळांचा समावेश आहे. त्याशिवाय, ४ बालवाडीताई पुरस्कार, आकुर्डी आणि पिंपरी उन्नत केंद्रातील प्रत्येकी १ विषयतज्ज्ञ १ पर्यवेक्षक आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी महापालिका शाळांतून २५ शिक्षकांचे अर्ज आले होते. खासगी अनुदानित प्राथमिक शाळांतून ९ तर, खासगी अनुदानित माध्यमिक शाळांतून ४ अर्ज आले होते. बालवाडीताईसाठी १३ तर, आदर्श शाळांसाठी ८ अर्ज आले होते, अशी माहिती पर्यवेक्षिका अनिता जोशी, पर्यवेक्षक सुनील लांबी, राजेंद्र कांगुडे यांनी दिली.
पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी ९ जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामध्ये एससीईआरटीचे ६ विषयतज्ज्ञ आणि महापालिका ३ शिक्षण विभागाच्या ३ पर्यवेक्षकांचा समावेश आहे. पुरस्कारासाठी शाळा व शिक्षकांना प्रत्येकी १५ निकष ठरविण्यात आले होते. या निकषांवर उतरणाऱ्या व गुणानुक्रमे अग्रक्रमावर असलेल्या शाळा व शिक्षकांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.















