- वाचा.. कशी करतात ज्येष्ठा गौरी विसर्जन पूजा विधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२२) : – तीन दिवस चालणाऱ्या ज्येष्ठा गौरी उत्सवात आज गौरींच विसर्जन केले जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात यंदा मोठ्या उत्साहात ज्येष्ठा गौरींचा सण पार पडला. शनिवारी ३ सप्टेंबरला पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात आली. यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी गौरी पूजनानिमित्त सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला. पुजेत ज्येष्ठा गौरींना विविध प्रकारच्या पदार्थांचा नैव्यद्य दाखवण्यात आला. त्यानंतर आज गौरींचे विसर्जन केले जाणार आहे.
ज्येष्ठा गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त
तीन दिवसांच्या या उत्सवात तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरींची विधीपूर्वक विसर्जन केले जाते. आज सोमवारी ५ सप्टेंबर रोजी गौरींचे विसर्जन केले जाणार आहे.
ज्येष्ठा गौरी विसर्जन शुभ मुहूर्त : सकाळी ०६:०१ ते सायंकाळी ०६.३८ पर्यंत. ज्येष्ठा गौरी विसर्जनाचा एकूण कालावधी: १२ तास ३७ मिनिटे
ज्येष्ठा गौरी विसर्जन पूजा विधी
ज्येष्ठा गौरींचे विसर्जन भाद्रपद शुक्ल नवमी तिथीला केला जाते. यावर्षी ही तिथी ५ सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर गौरींची विधीवत पूजा करून आरती केली जाते आणि त्यानंतर मुर्तीचे मुकूट हलवून गौरींना निरोप दिला जातो. त्याआधी घरासमोर रांगोळी काढून हळदी-कुंकवाने गौरींची मार्गस्त पावले काढली जातात. त्यासाठी हातांच्या छापे काढले जातात आणि गौरीचे विसर्जन केले जाते. काही ठिकाणी गौरींच्या मुर्ती विसर्जित केल्या जातात तर काही ठिकाणी त्याच मूर्ती परंपरागत वापरण्याची प्रथा आहे.
काय आहे महत्त्व?
पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणिमात्रांचे दुःख नाहीसे केले. त्यामुळे सर्व स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी भाद्रपद शुक्ल अष्टमीला ज्येष्ठ गौरीचे व्रत करतात. गौरी हे माता पार्वतीचे दूसरे नाव आहे. जेष्ठ नक्षत्रादरम्यान हा उत्सव येतो त्यामुळे त्याला जेष्ठा गौरी पूजन म्हटले जाते.


















