- उर्से टोल नाक्याजवळील घटना; जीवितहानी नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ सप्टेंबर २०२२) :- आमदार नीतेश राणे यांचे कुटुंबीय प्रवास करीत असलेल्या कारला पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना मुंबई- बंगळूर महामार्गावरील उर्से टोल नाका, तळेगाव येथे सोमवारी (दि. ५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक नारायण बेटेगौडा (रा. कर्नाटक) याला ताब्यात घेतले आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार नीतेश राणे यांचे कुटुंबीय कारमध्ये खालापूरकडून पुण्याच्या दिशेने येत होते. दरम्यान, तळेगाव येथील उर्से टोल नाक्याजवळ आरोपी चालवत असलेल्या ट्रकने पाठीमागून त्यांच्या कारला धडक दिली. सुदैवाने ट्रकचा वेग कमी असल्याने कारचा बंपर तुटून किरकोळ नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. राणे कुटुंबीयांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.















