- दोघांचा जागीच मृत्यू तर दहा जण गंभीर जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ सप्टेंबर २०२२) :- मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईच्या दिशेने माडप बोगद्याजवळ इको कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. इको कारमधील दोघांचा मृत्यू झाला असून दहा जण किरकोळ आणि गंभीर जखमी झाले आहेत.
पंक्चर झालेला टायर बदलण्यासाठी ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याला कारने मागून धडक दिली. धडक एवढी गंभीर होती की, इको कार मधील सर्वच प्रवाशांना इजा झाली.
लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर, वय -२४ व गणेश बाळू कोंढाळकर, वय -२२, रा. कोंढावळे, ता. वाई, जिल्हा सातारा यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर जखमी प्रवाशांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. त्यातील सहा ते सात जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत. त्यांची प्रकृती नाजूक आहे.
रात्री दोन वाजताचे सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. इको कार मधील जखमींना बाहेर काढण्यासाठी आयआरबी पेट्रोलिंग आणि देवदूत यंत्रणेला मोठी शिकस्त करावी लागली.















