- शहरातील गणेश मंडळांच्या भेटीदरम्यान अजित पवारांची स्पष्टोक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२२) :- ”महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन माझा दौरा नाही. आजही कोणालाही माहिती नाही की निवडणुका कधी होतील. मी कुठल्याही गोष्टी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत नाही. हा माझा स्वभाव नाही. पिंपरी-चिंचवडने अनेक वर्ष मला अतोनात प्रेम दिले आहे. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच या भागातूनच झाली. तेव्हापासून या सगळ्या जनतेशी माझा संबंध आहे. मी कधीही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन असले कार्यक्रम करत नसतो. मी माझ्या श्रद्धेपोटी, समाधान मिळते. कार्यकर्ते भेटतात म्हणून मी गणेशमंडळांना भेटी देत आहे.”
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध गणेश मंडळांच्या भेटीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार गुरुवारी शहरात आले आहेत. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. काळेवाडी येथील श्री कृष्ण मंदिराच्या भेटीपासून दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्या दौ-याला सुरुवात झाली. रात्री साडेनऊ पर्यंत ते गणेश मंडळांना भेटी देणार आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले, ” दोन वर्ष कोरोनाच्या काळात सार्वजनिक उत्सवात कोणाला भाग घेता आला नाही. साधेपणाने सण साजरा करावे लागले. काल मुंबईतील महत्वाच्या काही गणेश मंडळांना भेटी दिल्या. आज दुपारपासून पिंपरी-चिंचवडमधील मंडळांना भेटी देण्यास सुरुवात केली. त्यातून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी होतात. मंडळांनाही चांगले वाटते. मला पण एक समाधान मिळते. पावसाने शेतकरी वर्गाचे नुकसानही केलेले आहे. कालपण कोकणसह काही भागात जोराचा पाऊस झाला आहे. नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्यांना उभे करायचे, सावरायचे असते. त्यांना मदत करायची असते. सरकारने शेतक-यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे.”
पिंपळे सौदागर परिसरातील शिवशंभो सेवा मंडळ, क्रांती मित्र मंडळ, क्रांती क्रिडा मंडळ आदी मंडळाच्या श्री गणेशाची आरती अजितदादांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, माजी महपौर संजोग वाघेरे, माजी नगरसेविका सौ. शितलताई काटे, मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















