न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२२) :-पिंपरी चिंचवड शहरातील गणेश उत्सव उद्या शुक्रवारी (दि. ९) रोजी समाप्त होत असून गणेशाचे विसर्जन होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह सोसायट्या आणि घरगुती मिरवणुकी निघणार आहेत. त्यामुळे नदी घाटांसह अन्य विसर्जन घाटांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सर्व ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित ठेवली असून, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जीवरक्षकही तैनात आहेत.
महापालिकेने शहरातील प्रमुख दहा गणेश विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिका तैनात ठेवल्या आहेत. यांसह इतर घाटांवर जीवरक्षक, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा पथक नेमण्यात आले आहेत. घाटांवर विसर्जन हौद उभारले असून स्वयंसेवी संस्थांमार्फत मूर्ती संकलन सुरू आहे. २६ घाटांवर लाइफ जॅकेट, रिंग, गळ, बोट, मेगा फोन, दोरी अशा रेस्क्यू साहित्यासह अग्निशमन पथक तैनात आहेत. वैद्यकीय साहित्य, औषधे आणि रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक तैनात ठेवले आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका वाहनचालक, सफाई कामगारांचा समावेश आहे.
भाविकांनी विसर्जन मिरवणुकीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. खबरदारी म्हणून शक्यतो मास्क वापरावा. बाहेरील उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नयेत. शहरातील रस्ते बंद ठेवल्याने पर्यायी मार्ग वापरावेत. मूर्ती व निर्माल्य नदीपात्रात न टाकता दान करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.


















