न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२२) :- ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात आणि जल्लोषात पिंपरी व रहाटणी भागातील गणेश भक्तांनी शुक्रवारी बाप्पाला निरोप दिला. मिरवणूक रात्री १२ वाजे पर्यंत सुरु होती. तब्बल साडेसात तास चाललेली विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.

पालिकेच्या वतीने पिंपरी कॅम्पातील कराची चौक येथे गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकांचे स्वागत करण्यासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. आयुक्त तथा प्रशासक शिखर सिंह व त्यांच्या पत्नी ईशा सिंह, जुने संपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य अधिकारी उदय जरांडे व इतर मनपा अधिकारी यांच्या हस्ते मंडळांचे स्वागत करण्यात आले.

दुपारी चारनंतर कराची चौक येथे गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका येण्यास सुरुवात झाली. कोहिनूर मित्र मंडळ, रिव्हर रोड गणपती विसर्जन मिरवणूकीनंतर वेग वाढला. चौकाच्या चारही बाजूला लोकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती. लालबहादूर शास्त्री भाजी मंडई व्यापारी संघटना, पिंपरी यांच्या गणपती बाप्पाच्या रथाने सर्वांची लक्ष वेधले. आकर्षक सुवर्ण मंदिरात गणपती बसवून मिरवणूक काढण्यात आली होती.

मिरवणुकीत विविध गणेश मंडळांच्या कला व क्रीडा पथकांद्वारे महापालिकेच्या नियंत्रण कक्षासमोर ढोलताशांच्या गजरात तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी काठी अशा शिवकालीन साहसी खेळांचे व कलांचे चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर करण्यात आले. या पथकांमध्ये लहान मुलांसह महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. लहान मुलांनी सादर केलेल्या साहसी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.ढोल पथकांनी धरलेल्या ठेक्याने
गणेशभक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता.

दरम्यान, शहरातील इतर विसर्जन घाटांवर देखील गणेश विसर्जन पार पडले. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला मंडळांनी प्राधान्य देत कृत्रिम विसर्जन हौदात मूर्ती विसर्जित केल्या गेल्या. बहुतांश मंडळांनी स्वयंसेवी संस्थांकडे विसर्जनासाठी मूर्तीदान करण्यावर भर दिला. गणपतीदान उपक्रमाला देखील उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. क्षेत्रीय अधिका-यांच्या नियंत्रणाखाली सर्व विसर्जन घाटांवर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. जीवरक्षक, अग्निशमन दल,
सुरक्षा दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक, महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्यासह यंत्रणा तैनात करण्यात आली होती.
















