न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात नव्या १०५ ई बस दाखल होणार आहेत. त्यासाठी निगडी आणि भोसरी येथे बस डेपो बनविण्यात येणार आहे. पीएमपीएमएल प्रशासनाकडून लवकरच त्याबाबत पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यानंतर आवश्यक मनुष्यबळ, खर्च आदींचा प्रस्ताव इलेकट्रिक बस प्रकल्पाच्या समन्वयाकडून पीएमपीएमएल प्रशासनाला पाठविण्यात येणार आहे.
सध्या शहरात ६० ई बस विविध १० मागांवर धावत आहेत. त्याला प्रवाशांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे ई बस प्रकल्पाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे. प्रवाशांना देखील निर्धारित स्थळी वेळेत पोहचता येत आहे. त्यामुळे अनेकांनी ई – बसला प्रतिसाद दिला आहे. प्रवाशांची वाढती पसंती पाहता शहरात आणखी ई बस वाढविण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला आहे.
शहरात आता नव्याने १०५ ई बस विविध मार्गावर धावणार आहेत. त्यासाठी निगडी येथे ४५ तर भोसरी येथे ६० बसेसचा डेपो बनविण्यात येणार आहे. पीएमपीएमपीएल प्रशासन त्या बाबत अधिकृतरित्या ई बस प्रकल्प व्यवस्थापनाला कळविणार आहे. त्यामध्ये बस डेपो बनविण्याचे काम कधी पासून सुरू करायचे, कोणत्या मार्गावर बसेस धावणार, प्रवासाच्या सोयीसाठी कधीपासून त्या सुरू करायच्या याची माहिती पीएमपीएमपीएल प्रशासन देणार आहे. त्यानंतर किती मनुष्यबळ आवश्यक आहे. बस डेपो बनविण्याचा खर्च सादर करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
निगडी येथे ४५ तर भोसरी येथे ६० ई बसेसचा डेपो तयार करण्यात येणार आहे. पीएमपीएमएल प्रशासन आम्हाला सूचना करणार आहे. ते पाहून पुढील नियोजन आम्ही करणार आहोत. लवकरच शहरवासियांसाठी १०५ ई बस उपलब्ध होणार आहेत. – प्रवीण आल्हाट, प्रकल्प प्रमुख, ई बस, पुणे-पिंपरी चिंचवड…
















