न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात ११ कोटी १३ लाख रुपये खर्च करून चिंचवडमधील सायन्स पार्कच्या आवारात तारांगण बांधण्यात आले आहे. मात्र, उद्घाटनाअभावी तारांगण धूळखात पडले आहे. त्यामुळे खगोल अभ्यासक व विद्यार्थी नाराजी व्यक्त करीत आहेत. आकाशगंगा, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सूर्य, पृथ्वी यांच्या म्हणजे खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी शहरातील विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा, म्हणून हे तारांगण उभारण्यात आले आहे. ऑटो मेकॅनिकल आणि टू डी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून आकाशातील ग्रह-ताऱ्यांचा अनुभव घेता येईल, अशी व्यवस्था आहे.
त्यात १८० आसन क्षमता आहे. १५ मीटर व्यासाचा अर्थगोलाकृती डोम तयार करण्यात आला आहे. या कॅमे-यांच्या माध्यमातून पांढऱ्या शुभ रंगाच्या डोमवर तारे दाखवण्यात येतात. या माध्यमातून प्रत्यक्ष आकाशगंगेत असल्यासारखा अनुभव नागरिकांना येणार आहे. त्यासाठी पालिकेने ११ कोटी १२ लाख लाखांचा खर्च केला आहे. ते काम जपान टोकियोच्या ठेकेदार कंपनीने केले आहे. मार्च २०१८ ला प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले कामांची मुदत १० महिने होती. मात्र, कोरोना महामारीमुळे कामास विलंब झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे. कामास तब्बल तीन वेळा मुदतवाढ दिली. रडतखडत काम पाच वर्षांनी पूर्ण झाले. ११ जूनला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तारांगण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार होते. मात्र, पवार यांचा दौरा अचानक रद्द झाला. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांची बदली झाली त्यामुळे उद्घाटन रखडले आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेचे तारांगण बांधून तयार झाले आहे. त्याचे उद्घाटन तांत्रिक कारणांमुळे स्थगित झाले. सद्यस्थितीत महापालिकेत लोकप्रतिनिधी व पदाधिकारी नाहीत. तसेच शहराला पालकमंत्री नसल्याने उद्घाटन नेमके कसे करायचे, असा प्रश्न आहे. याबाबत आयुक्त लवकरच निर्णय घेतील. त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे विद्युत विभागाचे सहशहर अभियंता संजय खाबडे यांनी सांगितले.
















