- दहा दिवस होती ” उन्नतिचा गणपती महोत्सव २०२२ ” चीच धूम..
- सोसायटी वर्गाच्या सहभागाने परिसर गणेशमय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२२) :- ” गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ”… असा जयघोष करत वारकरी संप्रदाय सहवासात, हरिनामाच्या गजरात टाळ-मृदुंग, भजनात तल्लीन होत भक्तिपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरणात उन्नतीच्या लाडक्या गणरायाचे शुक्रवारी (दि. ९) रोजी विसर्जन करण्यात आले.
पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या कार्यालयातून दुपारी चार वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. आनंद हास्य क्लब, जेष्ठ नागरिक संघ आणि विठाई वाचनालयाचे सदस्य आणि मोठ्या संख्येने गणेशभक्त व नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते. तब्बल चार तास चाललेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीची शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास सांगता झाली. मर्दानी खेळ, सनई चौघड्यांचे वादन, बॅण्ड पथके आणि ढोल ताशांचा गजर तसेच रांगोळीच्या आणि विविधरंगी फुलांच्या पायघड्या अशा पारंपारिक आणि भक्तीमय वातावरणात गणपतीला निरोप देण्यात आला. विविध घोषणांनी विसर्जन मार्ग दुमदुमून गेला होता.
गेल्या दहा दिवसांपासून उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे आणि उद्योजक संजय भिसे यांच्या पुढाकारातून ” उन्नतिचा गणपती महोत्सव २०२२ ” अंतर्गत आणि उन्नती महिला मंडळा च्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील विविध सोसायटीत सांप्रदायिक वातावरण तयार झाले होते. परिसरातील गणेश भक्तांसह अबाल वृद्धांचा उत्साह ओसंडून वाहत होता. तसाच उत्साह अखेरच्या दिवशी पहावयास मिळाला.
अलकोव्ह सोसायटीचे चेरमन विजय भांगरे म्हणाले ” पिंपळे सौदागर येथील सोसायटी वर्गात गेले दहा दिवस ” उन्नतिचा गणपती महोत्सव २०२२ ” ची धूम होती. कार्यक्रमांच्या निमित्ताने परिसरातील नागरिक एकत्र जमले. एकमेकांचा परिचय वाढला. विचारांची देवाणघेवाण होतेय. याचे खरे श्रेय उन्नती सोशल फाउंडेशनला जाते. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबाबत आम्ही त्यांचे आभार मानतो. ”


















