- ” मालमत्ता जप्त का करू नये ? ”, पालिकेची थकबाकीदारांना विचारणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने थकीत मिळकत धारकांबाबत कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली. शहरातील ५० हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या २६ हजार ७६०, पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक १ हजार ३६१ तर मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या ३ हजार ८५० मिळकतधारकांना जप्तीच्या नोटिसा दिल्या आहेत. मिळकत धारकांकडे तब्बल ६३१ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. ही वसुली करण्यासाठी महापालिकेच्या करसंकलन विभागाने मोहीम हाती घेतली आहे.
शहरात ५ लाख ७९ हजार मिळकतींची नोंद आहे. चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत सुमारे तीनशे कोटी रुपये कराचा भरणा केला आहे. महापालिकेच्या १७ विभागीय कार्यालयामार्फत कर संकलनाचे कामकाज केले जाते. कर संकलन विभागाने शहरातील ५० हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या २६ हजार ७६०, पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या १ हजार ३६१ तर मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या ३ हजार ८५० मिळकतधारकांची यादी काढली आहे. त्यानुसार ३१ हजार ९ मिळकतधारकांना मालमत्ता जप्त का करू नये, अशा नोटिसा धाडल्या आहेत. या मिळकतधारकांकडे शास्ती कर वगळून ६३१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या सर्व मिळकतधारकांनी लवकरात लवकर कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले.
मालमत्ता बांधल्यापासून एकदाही कराचा भरणा न केलेल्या मिळकतींची आकडेवारी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये या ३ हजार ८५० मिळकतधारकांना करसंकलन विभागाने नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांच्याकडे २३ कोटी २५ लाखांची थकबाकी आहे. करसंकलन विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पालिका आयुक्त शेखर सिंह आग्रही आहेत. एक हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वसुली मोहीम हाती घेतली आहे. – नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त कर आकारणी व कर संकलन विभाग…















