न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्ताकराची वसुली होण्यासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाय योजनांसाठीच्या खर्चाची तरतूद मालमत्ता कर वसुली खर्च या लेखाशिर्षातून करण्यात येते. मात्र, सन २०२२-२३ आर्थिक वर्षातील कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तरतूद कमी पडत असल्याने या लेखाशीर्षावर मालमत्ताकर सर्वेक्षण या लेखाशिर्षातील एक कोटी रुपये वळविण्यात येणार आहेत.
कर आकारणी व कर संकलन विभागाचे कर आकारणी व कर वसुलीचे कामकाज कर संकलन मुख्य कार्यालय व करसंकलन विभागीय कार्यालयांमार्फत चालते. मात्र, बहुतांश नागरिक महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास इच्छुक नसतात. त्यासाठी महापालिका महसुली उत्पन्नामध्ये वाढ करणे, अंदाजपत्रकीय उद्दिष्टांची पूर्तता करणे याकरिता करसंकलन विभागामार्फत उपाययोजना राबविण्यात येतात. विभागाच्या विविध सवलतींचे फ्लेक्स किंवा बॅनर्स शहरातील मुख्य चौकात उभारणे, खासगी रेडिओमार्फत जिंगल्स प्रसिद्ध करणे, करसंकलन विभागातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देणे. थकीत मालमत्ताधारकांना घरभेटी देणे, जप्तीपूर्व नोटीस बजावणे, अंतिमतः जप्ती कार्यवाही करणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या नवनवीन उपाय योजनांमुळे मालमत्ता कराची आकारणी मोठ्या प्रमाणात होत आहे. मालमत्ताकराची वसुली होण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाय योजनांसाठीच्या सर्व खर्चाची तरतूद मालमत्ता कर वसुली खर्चातून करण्यात येते. कर आकारणी व कर संकलन विभागास सन २०२२-२३ करिता ९५० कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मालमत्ता कर खर्चासाठी सन २०२२-२३ करिता ४० लाख रुपये इतकी तरतूद आहे. आतापर्यंत या लेखाशिर्षातून १४ लाख ४३ हजार रुपये खर्च झाला असून, २५ लाख ५६ हजार रुपये इतकी तरतूद शिल्लक आहे. त्यामुळे वसुली खर्च लेखाशीर्षावर एक कोटी रुपये मालमत्ताकर सर्वेक्षण या लेखाशिर्षातून वळविण्यात येणार आहेत.


















