न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १४ सप्टेंबर २०२२) :- मॉस्कोमधील रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा आज बुधवारी (दि. १४) रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे, हे रशियातील मॉस्कोत उपस्थित होते.
सायंकाळी मॉस्कोतील हिंदुस्थानच्या दुतावासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण होईल. हिंदुस्थान सांस्कृतिक संबंध परिषद लोमोनोसोव्ह मॉस्को युनिव्हर्सिटी, द इन्स्टिटय़ूट ऑफ ओरिएंटल स्टडीज ऑफ द रशियन अॅपॅडमी ऑफ सायन्स, रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द हय़ुमॅनिटीज, पुश्किन रशियन लँगवेज इन्स्टिटय़ूट, सेंट पिटर्सबर्ग युनिव्हर्सिटी अशा अनेक संस्था या आयोजनात सहभागी आहेत.
अमित गोरखे म्हणाले, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हिंदुस्थान-रशिया संबंधांची ७५ वर्षे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे रशियातील वास्तव्य आणि त्यांच्या साहित्याचा रशियात असलेला प्रभाव, असे सर्व योग साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय काही उद्योजक आणि कंपन्यांसोबतसुद्धा महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या अनुषंगाने या दौऱ्यात भेटीगाठी होणार आहेत.















