- गरबा अन् दांडिया प्रशिक्षणाचा शहरात आलाय ऊत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२२) :- गणेशोत्सवानंतर आता सर्वांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. शाहूनगर, पूर्णानगर चिखली मोशी-जाधववाडीसह आजुबाजुच्या परिसरात इच्छुकांकडून गरबा अन् दांडिया प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सोसायट्या, उद्यान, सभागृह अशा ठिकाणी ही शिबिरे भरविण्यात आली असून या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून केला जात आहे.
पारंपरिक गरबा नृत्य आणि दांडिया यांची तरुणी महिलांना प्रचंड आवड आहे. कितीही व्यस्त असल्या तरी संपूर्ण नवरात्री दांडिया कार्यक्रमांना महिला-तरुणी आवर्जून जातातच. गेल्या काही वर्षांपासून कॉलनी सोसायट्यांमध्येही दांडिया कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. अगदी मुलांनाही या खेळाचा मोह सुटत नाही. आपला प्रभाग आणि त्यातील सोसायट्यांना फोकस करून प्रशिक्षण शिबिर भरविले जात आहेत.
गरबा दांडिया शिकवताना इच्छुकांचीही सोसायटीत एंट्री होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे इच्च्छुकांना आता रास दांडियाचे वेध लागले आहेत. प्रशिक्षण शिबिर घेऊन उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यास आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहेत. दरवर्षी मोजक्या ठिकाणी घेण्यात येणारा गरबा अन् दांडिया आता सर्वत्र पाहायला मिळणार आहे. बक्षिसाची लयलूट यंदाच्या नवरात्रोत्सवात पाहायला मिळणार आहे.