न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२२) :- हिंजवडीतील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण करून, भाजी, मांस, मच्छी, कपडे, इतर साहित्य व वस्तू विक्री करणाऱ्या दोनशे व्यावसायिकांवर हिंजवडी ग्रामपंचायतीने रविवारी (दि. १८) धडक कारवाई केली.
कारवाईत हिंजवडी पोलिस, वाहतूक पोलिस, ग्रामपंचायत कर्मचारी, लिपिक यांच्या मदतीने तात्पुरता स्वच्छता कर आकारून, व्यावसायिकांना मंडई आवारात स्थलांतरीत करण्यात आले. यावेळी सरपंच मच्छिंद्र हुलावळे, ग्रामपंचायत सदस्य, फौजदार दिलीप लोखंडे उपस्थित होते.
ग्रामसभेत आयटीतील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण करून, रस्ता गिळंकृत करणाऱ्या व वाहतूक समस्येत भर घालणाऱ्या पथारी व्यावसायिकांवर कारवाई का केली जात नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला होता. उद्धट वर्तन करणाऱ्या व्यवसायिकांना हटविण्यासाठी हिंजवडी पोलिसांची मदत घेण्यात आली होती. त्यावेळी किरकोळ वाद वगळता आपत्तीजनक प्रकार घडला नाहीत.