न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२२) :- बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर परिवर्तन मोर्चा काढणार आहे. बसपाचे प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देशाचे प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ यांच्या आदेशाने आयोजित या मोर्चात शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी पत्रकार परिषदेत केले.
हा परिवर्तन मोर्चा गुरुवारी सकाळी ११:३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुणे मुंबई महामार्गावरून मोरवाडी चौकातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन येथे येणार आहे.
नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा, रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन, गुंठेवारीतील बांधकाम नियमित करण्याबाबत शुल्क कमी करणे, पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत उपचार, अनधिकृत बांधकाम, माता रमाई यांचे स्मारक, राष्ट्रपिता महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक अशा अनेक विषयांना वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा निघणार आहे.
यावेळी पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश गायकवाड, पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष धम्मदिप लगाडे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुशिल गवळी, पुणे जिल्हाध्यक्ष रमेश आप्पा गायकवाड, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष अनिल रणनवरे आदी उपस्थित होते.