न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२२) :- मोठमोठ्याने आरडाओरडा आणि शिवीगाळ करत भोसरीकडून नाशिक फाट्याकडे आरोपी पायी जात होता. त्याच्या तोंडातून रक्त येत असल्याने आपण पोलीस असल्याचे सांगून मदतीसाठी भोसरी वाहतूक विभागातील पोलिसाने विचारपूस केली. त्यावर त्याने फिर्यादींसोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली.
भोसरी वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर पार्क केलेल्या पोलीस व्हॅनवर दगड मारून काच फोडून नुकसान केले. फिर्यादी यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. भोसरी पोलिसांचे बिट मार्शल आणि डायल ११२ ही पथके पोलीस शिपायाच्या मदतीला आली.
ही घटना सोमवारी (दि. १९) अडीचच्या दरम्यान घडली. पोलीस शिपाई रामदास वाव्हळ यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राम कुंडलिक शिंदे (वय ३४, रा. घोडकी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.