न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी झालेली नियुक्ती रद्द झाली आहे. त्यांच्याजागी वसई-विरार महापालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
याबाबतचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी आज गुरुवारी (दि. २२) रोजी काढले आहेत. स्मिता झगडे या महापालिकेत उपायुक्त पदावर कायम राहणार आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची मंगळवारी (दि. १३) अचानक बदली झाली. त्यांच्या जागी पालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली होती. मात्र, दहा दिवस उलटूनही आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांना रूजू करून घेतले नव्हते. त्यामुळे आयुक्तांवर कोणाचा दबाव आहे आणि झगडे यांच्या नियुक्तीला कोणाचा विरोध आहे, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती. त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.