न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेसाठी सोमवारी (दि. २६) दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत मुहूर्त आहे. सोमवारी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत घटस्थापना करून पूजन करता येईल. नवरात्रोत्सवामध्ये शुक्रवारी (दि. ३०) ललितापंचमी आहे.
२ ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन असून त्या दिवशी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. ३ ऑक्टोबर रोजी महाष्टमीचा उपवास करावयाचा आहे. ४ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन म्हणजेच नवरात्र समाप्ती असून ५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे, अशी माहिती दाते पंचांगकर्तेचे मोहन दाते यांनी दिली.
ते म्हणाले, सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन आणि दसरा एका दिवशी येतात. मात्र, यंदा दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवरात्रोत्थापन आहे. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत किंवा नऊ दिवसांचा कालावधी असतो. महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. २ ऑक्टोबर रोजी अष्टमी मध्यरात्री आहे. त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मी पूजन दिलेले आहे. मात्र, दुर्गाष्टमी ३ ऑक्टोबर रोजी आहे. विजयादशमी म्हणजेच दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेकजण आपल्या नवीन उपक्रमाची सुरुवात करतात. हा विजयी मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २ वाजून २६ मिनिटे ते ३ वाजून ३१ मिनिटे या कालावधीत आहे.


















