न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- कर पावतीत किती कर आकारले जातात, कर पावतीमधील शिक्षणकर आणि शिक्षणकर फी यामधील फरक काय? कोरोना काळातील कर माफ आहे का? सदनिकांचे हस्तांतरण कसे करावे यासह मालमत्ता धारकांच्या विविध प्रश्नांच्या शंकाचे निरसन दुसऱ्या करसंवादमध्ये महापालिकेच्या कर आकारणी विभागाच्या करसकलन अधिकाऱ्यांनी केले. दुसऱ्या कर संवादला मालमत्ताधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.
पिंपरी – चिंचवड शहरातील सर्व मिळकतींचा महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागामार्फत कर गोळा केला जातो. करदात्यांचे विविध प्रश्न त्यांना करासंदर्भात येणाऱ्या अडचणी, मनातील शंकांची सोडवणूक करण्यासाठी जनसंवाद सभेच्या धर्तीवर ऑनलाइन पध्दतीने ‘ करसंवाद ‘ चे आयोजन करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यानुसार दुसरा कर संवाद शनिवार (दि. २४) सकाळी ११.३० वाजता फेसबुक, युट्यूबच्या माध्यमातून पार पडला.
कर संवादमध्ये देशमुख यांच्यासह प्रशासन अधिकारी नाना मोरे, श्रीकांत कोळप, कार्यालयीन अधीक्षक राजाराम सरगर, चंद्रकांत विरणक, सर्व मंडलाधिकारी उपस्थित होते. या करसंवादमध्ये २५० पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला. ४० नागरिकांनी ऑनलाइन प्रश्न विचारले. तर ४ मालमत्ताधारक प्रत्यक्षात महापालिकेत येऊन ऑफलाइन सहभागी झाले होते. मालमत्ताधारकांनी व्यक्तीगत मिळकतीसंदर्भात आणि कायदेशीर प्रश्नही विचारले. सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन मालमत्ताधारकांच्या शंकाचे निरंसन करण्यात आले.
मालमत्ताधारकांना जलद सेवा देण्यासाठी करसंकलन विभाग सातत्याने नवनवीन प्रयोग राबवत आहे. शहरातील मालमत्ता धारकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून ऑक्टोबर महिन्यामधील चौथ्या शनिवारी तिसरा करसंवाद होणार आहे.
– नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त, करसंकलन विभाग…


















