- शहरातील कचरा विलगीकरण, वेस्ट टू वेल्थवर पालिकेचा भर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेकडून ‘ स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ‘ साठी अंमलबजावणी आराखड्यानुसार कृती करण्यात येत आहे. त्यासाठी विभागनिहाय जबाबदारी निश्चित केली आहे. क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिका पातळीवर आवश्यक कामाबाबत कालमर्यादा निश्चित केली आहे. १०० टक्के कचरा विलगीकरण, ‘ कचऱ्यापासून संपत्ती ‘ (वेस्ट टू वेल्थ) या संकल्पनेवर काम आदी बाबींना त्यामध्ये प्राधान्यक्रम दिला आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात देश आणि राज्य पातळीवरील रँकींगमध्ये सुधारणा करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या ‘ स्वच्छ सर्वेक्षण २०२२ ‘ च्या निकालाची प्रतीक्षा आहे. हा निकाल ऑक्टोंबरमध्ये अपेक्षित आहे. दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ‘ ची घोषणा केंद्र सरकारने मे महिन्यात केली. या सर्वेक्षणात शहराची रँकींग सुधारण्यासाठी महापालिकेने काही प्रमुख बाबींवर भर दिला आहे. शहरामध्ये निर्मिती स्तरावर ओला व सुका कचऱ्याचे १०० टक्के विलगीकरण व्हावे, असे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे.
मोशी येथील ८१ एकर क्षेत्रातील कचरा डेपोमध्ये सुरु असलेल्या विविध प्रकल्पांचा नुकताच आढावा घेण्यात आला. आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उपायुक्त अजय चारठाणकर, सह – शहर अभियंता (पर्यावरण) संजय कुलकर्णी आदी या प्रसंगी उपस्थित होते. ‘ वेस्ट टू वेल्थ ‘ या संकल्पनेवर भर देताना कचऱ्यापासून वीजनिर्मिती आणि प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती या प्रकल्पांची प्रगती तपासण्यात आली.
‘ स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ‘ साठी महापालिकेने सप्टेंबर महिन्यापासून आवश्यक तयारी सुरु केली आहे. शहर स्वच्छतेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जात आहे. गवळीमाथा झोपडपट्टीत ‘ शून्य कचरा झोपडपट्टी ‘ या प्रकल्पाला १६ ऑगस्टपासून सुरुवात झाली. पथदर्शी प्रकल्प म्हणून त्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त अजय चारठाणकर यांनी दिली. शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांनी सोसायटी परिसरात कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रकल्प सुरु करायला हवे. त्यासाठी त्यांना नोटीसा बजावलेल्या आहेत. या निकषात बसणाऱ्या ७१० सोसायट्यांपैकी सध्या २११ सोसायट्यांनीच कंपोस्ट खत प्रकल्प उभारले आहेत. सोसायट्यांनी खत निर्मिती प्रकल्प उभारुन कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी महापालिका प्रशासनाची भूमिका आहे.
महापालिकेकडून ‘ स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ‘ साठी कृती आराखड्यानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. विभागनिहाय त्यासाठी जबाबदारी निश्चित केली आहे. क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिका पातळीवर आवश्यक कामाबाबत कालमर्यादा निश्चित केली आहे . जानेवारी २०२३ पर्यंत ही कार्यवाही चालणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण परिणामकारक व्हावे, यासाठी आमचा भर असणार आहे.
– अजय चारठाणकर, उपायुक्त, महापालिका…