न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२२) :- ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना चित्रपट क्षेत्रात आणि अभिनयातील योगदानासाठी यंदाचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
‘मेरा गाव मेरा देश’, ‘कटी पतंग’, ‘तीसरी मजिल’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री म्हणून आशा पारेख यांना ओळखले जाते. एके काळी त्यांनी त्यांच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले होते. त्यांनी अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती.
आशा पारेख यांचा जन्म २ ऑक्टोबर १९४२ रोजी झाला. १९५९ ते १९७३ या काळात बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते.
त्या ७९ वर्षांच्या आहेत. ६०-७० च्या दशकात त्या त्यांच्या मानधनामुळेही चर्चेत असायच्या. त्या काळात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती. आशा पारेख यांना बालपणापासून नृत्याची आवड होती. त्यांची आई सुधा पारेख यांनी आशा यांना नृत्य शिकण्यासाठी शिकवणीही लावली होती. राजेश खन्ना, मनोज कुमार , सुनील दत्त आणि धर्मेंद्र यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत आशा पारेख यांनी स्क्रिन शेअर केली. १९९२ मध्ये त्यांच्या अभिनयामधील योगदानासाठी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवही केला होता.