- वाहतूक पोलिसांकडून होतेय कठोर कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२२) :- वाहनांना काळ्या फिल्म बसवू नये, अशा सूचना परिवहन विभागाकडून कार डेकोरटर्स व्यावसायिकांना दिल्या जातात. त्याबाबत कायद्यातही तरतूद आहे. तरीदेखील कार डेकोरटर्स पैशांसाठी अशा काचा बसवून देतात. काळ्या काचा लावलेली वाहने बड्या लोकांची असतात, त्यामुळे सहसा त्यांना कुणीही जाब विचारण्याचा प्रयत्न करीत नाही. परिणामी काळ्या काचा लावलेली अनेक वाहने रस्त्याने धावताना दिसतात. काळ्या काचा लावून काही गैरकृत्ये होण्याची शक्यता असते. अनेकदा अशा वाहनांना पोलिसांकडून अभय दिले जात असल्याचा आरोप केला जातो. मात्र, पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे.
काळ्या काचा लावल्याप्रकरणी दररोज सुमारे ८० ते ९० वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत काळ्या काचा वापरणाऱ्या २२ हजार ७९८ वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून दोन कोटी २१ लाख ६० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. संजय गायखे यांनी काळ्या काचा असणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी वाहतूक पोलिसांकडे केली होती. त्यावर वाहतूक पोलिसांनी गायखे यांना उत्तर देत ही आकडेवाडी दिली आहे. वाहनांना काळ्या काचा लावण्यास शासनाने मनाई केली आहे. तरीही काहीजण वाहनांना काळ्या काचा लावून मिरवतात.
सध्या शहरात काळ्या काचा लावणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. भविष्यातही जास्तीत जास्त वाहनांवर अधिक प्रभावीपणे मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहनांना काळ्या काचा लावू नयेत.
– डी आर साळुंके, पोलीस निरीक्षक (प्रशासन) वाहतूक शाखा…