न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांच्या कामकाजात पुन्हा बदल करण्यात आला आहे. ग क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विनोद जळक यांच्याकडील क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार काढून फक्त स्वच्छ सर्वेक्षणाचे कामकाज कायम ठेवण्यात आले आहे.
तर प्रशासन अधिकारी शीतल वाकडे यांच्याकडील कर संकलन विभागाचा पदभार काढून ग क्षेत्रीय कार्यालयाचा नव्याने पदभार देण्यात आला आहे. प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी आदेश जारी केला आहे.
गेल्या महिन्यात राजेश पाटील यांची बदली झाल्याने शेखर सिंह यांनी महापालिका आयुक्त आणि प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतला. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या कामकाजात बदल होण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत होत्या. परंतु, सध्या आढावा घेत असून नंतर निर्णय घेणार असल्याचे शेखर सिंह यांनी सांगितले होते. आता त्या बदलांना सुरुवात होत असल्याचे दिसून येत आहे.