- माजी महापौर नितीन काळजे यांच्या समन्वयामुळे कचऱ्याचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचा ओला कचरा २ ऑक्टोबरपासून न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था प्रतिदिन १०० किलो कचरा निर्माण करतात, त्यांचा कचरा न उचलण्याबाबतच्या नोटिसा पालिकेने दिल्या होत्या. चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनने या निर्णयाविरोधात ओला कचरा पिंपरी चिंचवड मनपाच्या गेटवर आणून टाकण्याची आक्रमक भूमिका घेतली होती.
दरम्यान माजी महापौर नितीन आप्पा काळजे यांनी महापालिका आणि चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी यांच्यात समन्वय साधत बैठक घेतली. या बैठकीस महापालिकेच्या वतीने आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, सचिव प्रकाश जुकंटवार, संघटक संजय गोरड, सचिन तापकीर, फेडरेशन पदाधिकारी, सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी,सभासद उपस्थित होते
याबाबत माहिती देताना माजी महापौर नितीन काळजे म्हणाले, बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. महापालिका सोसायटीधारकांच्या सर्व अडचणी समजून घेईल. कोणतीही जबरदस्ती किंवा हटवादी भूमिका न घेता सोसायटीधारकांचा विचार करून समन्वयाने यावर तोडगा काढेल. मोठ्या प्रमाणात ओला कचरा निर्माण करणाऱ्या सन २०१६ नंतरच्या सोसायट्यांचा समावेश पहिला टप्प्यात असेल. सन २०१६ आधीच्या मोठ्या प्रमाणात ओला कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांचा समावेश दुसरा टप्प्यात होणार असून, दैनंदिन १०० किलो पेक्षा कमी कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांचा समावेश तिसरा टप्प्यात केला जाईल. त्यासाठी ९ किंवा १० ऑक्टोबरला शहरातील मोठ्या सोसायट्यांचे पदाधिकारी व सोसायटी फेडरेशन पदाधिकारी यांची कार्यशाळा घेतली जाईल. त्यात सोसायट्यांच्या सर्व अडीअडचणी समजावून घेऊन त्यावर उपाय शोधले जातील. हौसिंग फेडरेशनच्या मागणीप्रमाणे इंदोर शहराच्या धर्तीवर शहरात देखील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तो जिरवण्याच्या युनिटबाबत तपासणी केली जाईल, असे बैठकीत ठरले आहे.
सोसायट्यांमध्ये राहणारे नागरिक पालिकेला सर्वाधिक कर देतात. त्यामुळे त्यांना मुलभूत सोयीसुविधा पुरविणे पालिकेचे कर्तव्य आहे. ओल्या कचऱ्याबाबत महापालिकेने टोकाचा निर्णय घेऊ नये. सोसायट्यांना पर्यायी व्यवस्था उभारण्यास आणखी अवधी द्यावा. अन्यथा पालिका प्रशासन आणि सोसायटी नागरिक यांच्यातील संघर्ष आणखीनच वाढेल.
– नितीन आप्पा काळजे, माजी महापौर पिं. चिं. मनपा…२०१६ नंतरच्या मोठ्या गृहप्रकल्पात विकसकांनी ओला कचरा हा गृहप्रकल्पात जिरवण्याचे प्रकल्प करून देणे अनिवर्य असताना ते करून न दिल्याने बिल्डरवर नियमभंग केला म्हणून कारवाई केली जाईल. पालिकेच्या ज्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा गृहप्रकल्पास बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिले त्यांच्यावर कारवाई करण्याची फेडरेशनची मागणी आयुक्तांच्या अधिकारात येते. फेडरेशनने यासाठी आयुक्तांकडे पाठपूरावा करावा. माझे काम सोसायटीधारकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना सहकार्य करून अभियान यशस्वीपणे राबवणे आहे.
– अजय चारठाणकर, उपायुक्त, आरोग्य विभाग पिं.चिं. मनपा…