न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांची गुरुवारी (दि. २९) पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. दोन महिने रिक्त असलेल्या या पदावर प्रशासनाने अखेर अधिकारी नियुक्त केले आहेत.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय हे ३१ जुलै २०२२ ला सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून हे पद रिक्त होते. त्यांच्या दालनात आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर बसत आहेत. डॉ. रॉय हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आयुक्त राजेश पाटील यांची अचानक बदली झाल्याने डॉ. साळवे यांच्या पदोन्नतीचा निर्णय मागे पडला. अखेर, नवीन आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांच्या पदोन्नतीला हिरवा कंदील दाखविला. त्यानुसार डॉ. साळवे यांची पदोन्नती झाली आहे. दरम्यान, या पदावरून डॉ. रॉय व डॉ. साळवे यांचा न्यायालयात दावा सुरू होता.
स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद ओभासे यांची सहशहर अभियंता म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. त्यांची पदोन्नती करण्याची शिफारस पदोन्नती समितीने २३ सप्टेंबर २०२२ ला केली होती. त्यानुसार आयुक्त शेखर सिंह यांनी पदोन्नती दिली आहे. ओभासे हे स्थापत्य प्रकल्प विभागाचे प्रमुख आहेत.