न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध प्रकारच्या ४० नागरी सुविधांचे डिजिटल स्वरुपात आदानप्रदान करण्यात येत आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील ५० ठिकाणी स्मार्ट किओस्क बसविण्यात आले आहेत. १ लाख १२ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे.
ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही, अशांना डिजिटल सुविधांचा लाभ घेण्यासाठी शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट किऑस्क बसविण्यात आले आहेत. याद्वारे तक्रारी करता येतात, तक्रारींची दखल घेतली की नाही याबाबतचा तपशील पाहता येतो. ऑनलाइन मिळकत कर भरणे, पाणीपट्टी भरणे, कार्ड रिचार्ज करणे, मोबिलिटी तिकेटींग, इन्फॉर्मेटिव्ह अॅण्ड ट्रांजेक्शनल सर्व्हिसेस अशा एकूण ३५ ते ४० प्रकारच्या नागरी सुविधांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. सद्यस्थितीत याचा उपयोग लसीकरण मोहिम राबविण्यासाठी करण्यात येत आहे.
डिजिटल युगामध्ये स्मार्ट किऑस्कचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणे अपेक्षित आहे. परंतु, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्याची गरज आहे. बहुतांशी नागरिकांना याबाबत माहिती नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी याचा वापर होण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
















