- सरकारकडून शुल्कात मोठी वाढ होण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२२) :- आरटीओ कार्यालयातून नवीन वाहनांसाठी फॅन्सी किंवा आवडीचा नंबर घेणे आता अधिक महागात पडणार आहे. सरकारने ‘ चॉइस ‘ क्रमांकासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ केल्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी ३० दिवसांत अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. या हरकतीनंतर शुल्क वाढण्याची शक्यता आहे.
चॉइस नंबरसाठी सध्यापेक्षा दुप्पट रक्कम मोजावी लागेल. त्यामुळे अशा नंबरसाठी वाहनधारकांचा खिसा रिकामा होणार आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने १५ सप्टेंबर रोजी ‘ चॉइस ‘ नंबरबाबत नवीन अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत चॉइस नंबर घेण्यासाठीच्या सध्याच्या प्रक्रियेत काही बदल केले आहेत. या बदलांनुसार कोणत्याही चॉइस नंबरच्या वाटपासाठी किंवा त्याचा अर्ज ऑनलाइन परिवहन पोर्टलवर करता येणार आहे.
पैसे अधिक मोजावे लागणार
या अधिसूचनेनुसार पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, औरंगाबाद, रायगड, नागपूर, कोल्हापूर, नाशिक या शहरांमध्ये चारचाकी वाहनासाठी ०००१ हा क्रमांक घेण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीला इतर शहरांच्या तुलनेत एक लाख रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. एकाच क्रमांकासाठी जास्त अर्ज आल्यास आरटीओ कार्यालयाकडून लिलाव पद्धतीने चॉइस नंबरचे वाटप करावे लागते. त्यासाठी बँकेचा डीडी आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. पूर्वी किमान शुल्क साडेसात हजार होते. मालिकेतील शेवटच्या क्रमांकापासून १००० पेक्षा अधिक असलेल्या कोणत्याही चारचाकीच्या क्रमांकासाठी पूर्वी ७ हजार ५०० शुल्क असे. आता यासाठी १५ हजार रुपये लागणार आहेत.