न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२२) :- वायसीएम रुग्णालयातील एड्स नियंत्रणासाठी बजाज ऑटो कंपनीच्या सहकार्याने सुरू असलेले अँटी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) सेंटर आता वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर संस्था चालविणार आहे. या सेंटरसाठी १० अधिकारी-कर्मचारी आऊटसोर्सिंगद्वारे उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. एक वर्षासाठी ४५ लाख रुपये खर्च होणार आहे.
रुग्णालयात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने नोंदणीकृत संस्थेमार्फत विविध पदावरील अधिकारी – कर्मचारी आऊटसोर्सिंगद्वारे उपलब्ध करून घेण्यात येतात. रुग्णालयासाठी बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीकडून अधिकारी कर्मचारी पुरविण्यात येणार आहेत. रुग्णालयात रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) सेंटर कार्यान्वित आहे. हे सेंटर बजाज ऑटो लिमिटेड, राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि महापालिका यांच्यातील त्रिपक्षीय सामंजस्य कराराद्वारे कार्यरत होते. हा करार ३१ ऑगस्ट २०२२ ला संपुष्टात आला आहे. त्यामुळे हे एआरटी वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर पदविका संस्थेमार्फत चालविण्यात येणार आहे. त्यासाठी एक वर्षासाठी सुमारे ४५ लाख रुपये खर्च होणार आहे.
बीव्हीजी इंडिया कंपनीकडून एक वर्ष कालावधीकरिता आवश्यक मनुष्यबळ पुरवठा करण्यात येणार आहे. त्यानुसार, वैद्यकीय अधिकारी या वर्ग एकच्या पदासह समुपदेशक, फार्मासिस्ट, स्टाफनर्स, लॅब टेक्निशियन अशी एकूण १० पदे घेण्यात येणार आहेत. त्यांच्या प्रतिमाह वेतनावर एकूण ३ लाख ३५ हजार रुपये खर्च होणार आहे. उपकरणांच्या देखभाल – दुरुस्तीसाठी ४ लाख ७७ हजार रुपये खर्च होणार असून एकूण ४५ लाख खर्च होणार आहे.