- एप्रिलअखेरीस पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२२) :- बोपखेल व खडकीस जोडणाऱ्या मुळा नदीवर पुलाचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील वर्षी एप्रिलपर्यंत पुलाचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे एप्रिल अखेर बोपखेलवासीयांचा प्रवास सुखकर होणार आहे. सुरक्षेचे कारण पुढे करत दापोडीतील सीएमईने १३ मे २०१५ ला बोपखेल ते दापोडी हा नागरी रस्ता तेव्हापासून अचानक बंद केला. बोपखेलच्या रहिवाशांना सुमारे १५ किलोमीटर अंतराचा वळसा मारून ये- जा करावी लागते. या नागरिकांच्या सोईसाठी महापालिका बोपखेल व खडकीस जोडणारा १ हजार ८६६ मीटर लांबीचा पूल उभारत आहे.
बोपखेलच्या बाजूने व नदी पात्रावरील पुलाचे काम होऊन वर्ष झाले आहे. संरक्षण विभागाकडून ना हरकत दाखला न मिळाल्याने १४ महिने खडकीच्या बाजूने काम बंद होते. अखेर, हरकत दाखला मिळाल्यानंतर २ ऑक्टोबर २०२१ ला त्या बाजूने काम सुरू करण्यात आले. जोडरस्ता, रणगाडा रस्ता, अंतर्गत रस्ते आदींचा खर्च २१ कोटी आहे. पुलाच्या खडकीच्या बाजूच्या जोडरस्त्याची निविदा अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी १७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
५१२ आर्मी बेस वर्कशॉप, अॅम्युनिशन फॅक्टरी तसेच संरक्षण विभागाच्या इतर आस्थापनांच्या जवळून हा पूल जात असल्याने सुरक्षेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूंस पाच मीटर उंचीची सीमा भित उभारण्यात येत आहे. त्यावर १.५ मीटर उंचीचे व्हिजन बॅरिकेट बसविण्यात येणार आहेत. आतापर्यंत प्रकल्पाचे एकूण ७० टक्के काम झाले आहे. हे काम टी अॅण्ड टी इन्फ्रा कंपनी करीत आहे. एकूण ५३ कोटी ५३ लाख खर्च अपेक्षित आहे.
न्यायालयीन प्रक्रिया, संरक्षण विभागाकडून एनओसीला विलंब, कामास अडथळा ठरणारे वृक्ष हटविणे, संरक्षण विभागाने पुलासाठी टाकलेल्या अटी व शर्ती यामध्ये पुलाचे काम सुरू करण्यास बराच वेळ गेला. एप्रिलअखेरीपर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल. – प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता…