न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२२) :- चांदणी चौकातील पूल स्फोटकांनी पाडण्यात आल्यानंतर अकरा तासांनी बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. सकाळी दहाच्या सुमारास या भागातील वाहतूक पूर्ववत झाली. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील जुना पूल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास स्फोट घडवून पाडण्यात आला. पूल पाडण्यासाठी ६०० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. शनिवारी (१ ऑक्टोबर) बाह्यवळण मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. रात्रीपासून या भागात पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. रात्री दहानंतर या भागातील वाहतूक थांबविण्यात आली.
मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी स्फोटकांचा वापर करुन पूल पाडण्यात आला. त्यानंतर या भागातील राडारोडा काढण्यास सुरूवात करण्यात आली. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत राडारोडा हटवून बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास राडारोडा हटविण्यात आला. त्यानंतर अकराच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
दरम्यान रात्री १ वाजता स्फोट झाला आणि अगदी काही सेकंदात पुलाचा मध्यभाग खाली आला. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूचा भाग तसाच राहिला. त्यामुळे संपूर्ण पूल सहा सेकंदात जमीनदोस्त केला जाणार हा कंपनी आणि प्रशासनाचा दावा फोल ठरला. पूल न पडल्याने पोकलेनच्या मदतीने दोन्ही बाजूने पूल पाडण्यात आला. त्यात वेळ गेल्याने सकाळी ८ वाजता वाहतूक पूर्ववत करण्याचे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे नियोजनही कोलमडले. यामुळे रविवारी (२ ऑक्टोबर) सकाळी दोन्ही बाजूने तब्बल १० किलोमीटरपर्यंत जड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, सकाळी १० नंतर मुंबई-बंगळुरू मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्यास सुरुवात झाली.















