न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२२) :- गुन्हेगारीच्या मार्गाने मुले जाऊ नयेत, यासाठी पिंपरी – चिंचवड पोलीस विविध उपाय योजना राबवित आहेत. झोपडपट्टी आणि इतर भागात मुले दिवसभर भटकताना दिसतात. त्यातील काहीजण बिघडण्याच्या मार्गावर असतात. त्यामुळे त्यांच्यावर निगराणी ठेवण्यासाठी पोलिसांकडून स्थानिक महिलांची कमिटी बनवली जाणार आहे.
कळत नकळत गुन्ह्यात अडकल्या गेलेल्या मुलांनी पुन्हा गुन्हे करू नयेत यासाठी मुलांचे समुपदेशन केले जात आहे. ओटास्कीम सारख्या परिसरातील मुलांनी गुन्हेगारीकडे वळू नये यासाठी खेळाचे उपक्रम पोलिसांकडून राबविले जात आहेत. महापालिकेने या मुलांना खेळण्यासाठी दोन मैदाने उपलब्ध करून दिली आहेत. नुकतीच पोलीस आयुक्तांनी शहरातील विविध सामाजिक संघटना, झोपडपट्टीमध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांची बैठक घेतली.
रहिवासी भागात अनेक महिला घरीच असतात. परिसरातील टवाळखोर, रिकाम टेकड्या मुलांवर त्यांचे लक्ष असते. या मुलांना समज देऊन त्यांना शिक्षण, रोजगार याची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे अशा मुलांची माहिती गोळा करण्यासाठी घरी असणाऱ्या महिलांची पोलीस मदत घेणार आहेत. मुले बिघडत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कमिटीतील महिलांना केले आहे.