न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपुलाची डागडुजी करण्यात येत आहे. या कामाला सुरुवात होऊन तीन वर्ष लोटली, तरीही हे काम अर्धवट अवस्थेतच आहे.
पिंपरी कॅम्प ही शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे या उड्डाणपुलावर वाहतुकीचा भार असल्याने हा जुना पुल हळूहळू कमकुवत बनत चालला होता. त्यामुळे महापालिकेच्या स्थापत्य विभागाने पुलाची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले होते. तीन वर्षाचा कालावधी उलटला. तरी देखील पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
पहिल्या टप्प्यात पिंपरी भाटनगर व चिंचवड लिंक रस्ता मार्गाने येणा-या व मोरवाडीच्या बाजुला उतरणाऱ्या पुलाचा भाग दुरूस्त करण्याचे काम हाती घेतले. दीड ते दोन वर्ष कालावधीत हे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर पिंपरी चौक ते पिंपरी कॅम्प मार्गावरील पुलाच्या अर्ध्या भागाची दुरुस्ती करण्यात आली. दरम्यान, दोन्ही बाजुवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. हे काम तत्काळ पूर्ण करून उड्डाणपूल पुर्वरत करावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.