न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२२) :- महापालिका सेवांच्या वितरणात सुधारणा करण्यासाठी प्रभाग स्तरावर स्पर्धा आवश्यक आहे. त्यासाठी डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून शाश्वत विकास उद्दिष्टे स्थानिकीकरण करणेही गरजेचे आहे. त्यासाठी ‘इनवॉर्ड्स’ प्रकल्प उपयोगी ठरणार आहे. यामध्ये प्रभागस्तरीय मूल्यांकनासाठी ‘डेटा इनपुट’ यंत्रणा असलेले ‘वेबपोर्टल’ आणि भू-स्थानिक विश्लेषणात्मक ‘डॅशबोर्ड’चा समावेश केला आहे, अशी माहिती महापालिका प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, इंडिया स्मार्ट सिटीज फेलोशिप प्रोग्रॅम अंतर्गत टीम ऍस्पयरचे फेलोज पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी यांच्यामार्फत ‘इनवॉर्ड्स प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवडा उपक्रमांतर्गत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्या प्रारंभ सिंह यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते.
महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, शहर अभियंता मकरंद निकम, सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, उपायुक्त विठ्ठल जोशी, सुभाष इंगळे, अजय चारठाणकर, मनोज लोणकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहशहर अभियंता रामदास तांबे, कंपनी सेक्रेटरी चित्रा पवार आदी उपस्थित होते.
आकृती मुऱ्हेकर, अंशुल राठौर, सतरुपा रॉय आणि विघ्नेश्वर जे हे प्रकल्प विकसित करत आहेत. त्याचे सादरीकरण गुरुवारी केले. इनवॉर्ड्स प्रकल्पामध्ये शहरी क्षेत्रातील सेवांचे गुणात्मक मूल्यांकन करण्यासाठी नागरिकांच्या आकलनाची तरतूद केली आहे. यामुळे शहराच्या सुविधांचा प्रभाग स्तरावरील सर्वांगीण आढावा घेण्यासाठी मदत होणार आहे. नागरिकांचा सहभाग आणि त्यांच्या प्रयत्नांचे मोजमाप देखील सर्वसमावेशक विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल, असे इंडिया स्मार्ट सिटीज फेलोशिप प्रोग्रॅम अंतर्गत टीम ऍस्पयरने स्पष्ट केले.
महापालिकेच्या प्रभाग स्तरावरील मूल्यांकनासाठी प्रक्रिया, पारदर्शकता, लोकशाहीला चालना देण्यासाठी, प्रभागांची ताकद, कमकुवतपणाबद्दल प्रथमदर्शी ज्ञान मिळविण्यास वाव. शहरी सेवा वितरणाचे मूल्यमापन व झोनच्या मूल्यांकनासाठी एक सांख्यिकीय फ्रेमवर्क विकसित करणे. सेवा वितरण स्थितीचे डॅशबोर्डद्वारे दृश्यमान करून एकाधिक झोनचे तुलनात्मक विश्लेषण सक्षम करणे. प्रत्येक क्षेत्राचे परीक्षण, विश्लेषण, तुलना करण्यास वाव निर्माण करून मूल्यांकन समान व्यासपीठावर आणणे. डॅशबोर्ड शाश्वत व सर्वसमावेशक विकासाच्या चांगल्या सेवा वितरणासाठी माहितीपूर्ण निर्णय घेणे सुलभ. नागरिकांत सार्वजनिक सुविधांची उपलब्धता व सेवांविषयी जागरूकता निर्माण करून वास्तवाची जाणीव करणे, अशा इनवॉर्ड्स प्रकल्पाच्या खास बाबी आहेत.
















