न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२२) :- आज पहाटेच खासगी बसला आग लागून त्यामध्ये १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच नाशिकमधील कळवण तालुक्यातील श्री सप्तशृंगी गड येथे ग्रामपंचायतीच्या टोलनाक्याच्या जवळ आज एसटी बसला आग लागल्याची दुसरी घटना घडली आहे.
ही बस पिंपळगाव बसवंतहून सप्तशृंगी गडावर चालली होती. ही एसटी बस पिंपळगाव बसवंत डेपोची होती. आग लागल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून चालक आणि वाहक यांनी तत्काळ बसमधून खाली उड्या मारल्याने मोठी जीवितहानी टळली.
यात्रा नियंत्रण समितीने तेथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक स्वयंसेवक, विश्वस्त संस्थेचे सुरक्षा कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, रोप वे कर्मचारी आदी यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करून अग्निशमन साहित्याद्वारे तत्काळ आग विझविली. सर्वांनी प्रसंगावधान राखून वेळीच उपाययोजना योग्य प्रकारे राबविल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमध्ये कुठल्याही भाविकाला अथवा कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारे इजा झालेली नसून सर्वजण सुरक्षित आहेत.