न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रु.) :- नगरसेवक विकास डोळस यांनी बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवरील पूल व रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे, यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, महापालिका हद्दीतील बोपखेलचे नागरिक दापोडीतील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करीत होते. मात्र, बोपखेल गावासाठी दापोडी येथून सीएमई हद्दीतून जाणारा रस्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ मे २०१५ रोजी बंद करण्यात आला होता.
चार वर्षांपासून बोपखेलवासियांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारण्याचा आणि रस्ता करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात आवश्यक खर्चाची तरतूदही करण्यात आली.
परंतु, नदीवरील पूल आणि रस्त्यासाठी लष्कराच्या मालकीची चार एकर जागा संपादन करावी लागणार आहे. लष्कराने आधी या जागेचा मोबदला मागितला. जागा मोजणीनंतर बाजारभावानुसार २५ कोटी ८१ लाख रुपये देण्यास महापालिकेने तयारी दर्शविली. न्यायालयाने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोडणारा पूल उभारण्यास आणि सार्वजनिक रस्ता करण्यास परवानगी दिली.
त्यानंतर महापालिकेने मुळा नदीवर पूल उभारण्याच्या कामासाठी ४५ कोटी ४६ लाख ३९ हजार १२२ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. या पुलामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बोपखेलवासियांचा पुलाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. त्यासाठी तातडीने पुलाच्या कामाला स्थायी समितीची मान्यता घेण्यात यावी.
अनुषांगिक बाबी पुर्ण करुन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापुर्वी कामाला सुरुवात करावी. काम उच्च दर्जाचे करावे, अशी मागणी नगरसेवक विकास डोळस यांनी निवेदनातून आयुक्तांकडे केली आहे.











