न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२२) :- चिखलीतील भोसले बद्रर्स पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर लाकडी ड्राव्हरचे बनावट चावीने लॉक उघडुन त्यातील ८,९३,१३६ रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली होती. ही घटना शनिवारी (दि. १९) रात्री १०.३० वा. ते सकाळी ०६.०० वा. च्या दरम्यान घडली होती. याबाबत पेट्रोल पंपाचे मालक विशाल जगन्नाथ भोसले (रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट १ च्या पोलिसांनी यापूर्वी पेट्रोल पंपावर काम केलेल्या कामगारांची माहिती काढली. त्यात पंपावरील पूर्वीचा कामगार सीसीटिव्ही फुटेजमध्ये चोरी करताना आढळून आला. चोरी करून आरोपी त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेश येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखा युनिट १ चे पोलिस पथक आरोपीच्या शोधार्थ उत्तर प्रदेश येथे गेले.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे मान्य केले. अंकित रामबहादुर यादव (वय २२ वर्षे, रा.मु. मोहरीया, पो. इटवा. ता.महु, जि. चित्रकुट, उत्तरप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी अंकित हा पुर्वी पेट्रोल पंपावर कामास होता. त्यामुळे त्यास पेट्रोल पंपावर जमा होणाऱ्या रोख रक्कमेबाबत कल्पना होती. त्याने उत्तरप्रदेश येथुन येवुन चोरी करीत रातेरात उत्तर प्रदेश गाठले होते.
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ कडील पोलीस उप निरीक्षक रविंद्र राठोड, पोलीस अंमलदार महादेव जावळे, फारूख मुल्ला, गणेश महाडीक, अमित खानविलकर, सचिन मोरे यांच्या पथकाने केली.


















