न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ मार्च) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आज शनिवारी (दि. २) दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
यात स्थायी अमिती सभापतीसाठी भाजपकडून अधिकृत उमेदवारी विलास मडिगेरी यांना देण्यात आलेली असून, भाजपचेच निष्ठावंत शीतल शिंदे यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून राहुल कलाटे तर अनुमोदक म्हणून राष्ट्रवादीच्या गीता मंचरकर यांचे नाव आहे. तसेच राष्ट्रवादीकडून नगरसेवक मयूर कलाटे यांनीही अर्ज दाखल केला आहे.

बिनविरोध अध्यक्ष निवडीसाठी भाजपची खलबते सुरू होती परंतु, त्यास अपयश आले असून, आता स्थायी समिती सभापती पदासाठी तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे घोडाबाजारास आयते आवतन मिळते की सत्ताधारी आपल्याच पक्षाचे नगरसेवक व अपक्ष उमेदवार शीतल शिंदे यांची नाराजगी दूर करतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
प्रत्यक्षात ७ मार्च रोजी दुपारी बारा वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली आहे.











