न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ मार्च) :- प्रशासनाच्या मनमर्जी कारभारास वैतागून नगरसेविका माया बारणे यांनी शुक्रवार (दि. १) रोजी पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशव्दारासमोर ‘जागरण गोंधळ’ आंदोलन केले. नागरिकांच्या प्रश्नांवर वारंवार तक्रारी करूनही, त्याकडे प्रशासनाकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. झोपलेल्या या प्रशासनाला जागे करण्यासाठी हे ‘जागरण गोंधळ’ आंदोलन करण्यात आले आहे, असे माया बारणे यांनी यावेळी सांगितले आहे.
यावेळी बारणे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी थेरगाव मधील प्रभाग क्रमांक २४ चा काही दिवसांपूर्वी पाहणी दौरा केला होता. या पाहणी दौऱ्यात सर्व्हे नंबर १४ सोलाना हाऊसिंग सोसायटी व सर्व्हे नंबर २७ मध्ये सुखवानी चावला या बांधकाम व्यावसायिकांना सदर ठिकाणी १२ मीटर रुंदीचा रस्ता अस्तित्वात नसताना या बांधकाम व्यावसायिकांना कोणत्या आधारे बांधकाम परवानगी बांधकाम विभागाने मंजुरी देण्यात आली. याची सखोल चौकशी करावी.
तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कँनबेरी या संस्थेला पाणी पुरवठा विभागातील मीटर रेडींग घेणे तसेच पाणीपट्टी बिल देणे आदी कामे या संस्थेला दिली आहेत. परंतु या संस्थेविरुद्ध नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी आहेत. सदर संस्थेवर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. त्यामुळे या कामचुकार प्रशासनाला जागे करण्यासाठी ‘जागरण गोंधळ’ या आंदोलनाचा घाट घालावा लागला, असे बारणे यांनी सांगतिले आहे. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधात फलकबाजी करून, निषेध व्यक्त केला.











