पीएमआरडीएकडून जागा देण्याची तयारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०२२) :- मोशी आणि परिसरातील प्रवाशांना वेळेत आणि जलद बस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘पीएमपी’कडून (पुणे महानगर परिवहन महामंडळ) स्पाईन रोड पेठ क्रमांक ११ येथे ६० बसच्या डेपोचे नियोजन करण्यात आले आहे. या बस डेपोसाठी पीएमआरडीएकडून दोन एकर जागेची मागणी करण्यात आली असून पीएमआरडीएने देखील जागा देण्यास सकारात्मकता दर्शविली आहे. या जागेचे मुल्य पीएमपीने भरल्यानंतर जागा हस्तांतराची कार्यवाही होणार असून नवीन बस डेपो झाल्यास मोशीसह परिसरातील नागरिकांना प्रवासाची अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे.
‘पीएमआरडीए’ने ‘पीएमपी’ला बस डेपोच्या सुविधांसाठी काही जागा देण्यास यापूर्वीच होकार कळविला होता. मात्र त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे दिलेल्या जागा पुन्हा मागे घेण्याबाबतचे पत्र दिले होते. मध्यवर्ती सुविधा केंद्र भोसरी आणि मोशी सुविधा केंद्र ५ व ८ ची जागा विकसीत करणार असल्याचे पीएमआरडीएने कळविले होते. मात्र, सदर जागा बस डेपोसाठी आवश्यक असल्याचे पीएमपीने पत्राद्वारे कळविले होते. पुर्वी निश्चित केलेल्या जागेऐवजी पीएमआरडीएने पेठ क्रमांक ११ स्पाईन रोड येथील दोन एकर जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. या जागेचे अधिमूल्य १७ कोटी रुपये भरण्याची सूचनाही केल्या असून त्या बाबत पीएमपीचे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेऊन पुढील कार्यवाही करणार आहेत. ही जागा प्राप्ता झाल्यास मोशी, भोसरी, राजगुरूनगर, प्राधिकरण आदी परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होईल, अशी माहिती पीएमपीकडून देण्यात आली
पीएमआरडीने स्पाईन रोड येथे दोन एकर पर्यायी जागा पीएमपीला सुचवली आहे. त्याचे अभिमूल्य भरायला सांगितले आहे. ही जागा ताब्यात आल्यास ६० बसेसचा डेपो होणार आहे. त्यामुळे नागरिकांची अधिक सोय होईल.
– डी. एम. तुळपुळे, मुख्य अभियंता, पीएमपी.


















