न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ मार्च) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून शीतल उर्फ विजय गोरख शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. परंतु अर्ज दाखल करण्याच्या अंतिम क्षणी भारतीय जनता पक्षाकडून प्रबळ इच्छुक शीतल शिंदे यांना डावलून भाजपचेच नगरसेवक व स्थायी समिती सदस्य विलास माडिगेरी यांच्या नावाचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
त्यामुळे शीतल उर्फ विजय गोरख शिंदे यांनी पक्षाकडून बंडाळी करीत बंडखोर म्हणून अर्ज दाखल केला आहे. याबाबत नगरसेवक शीतल शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषद माहिती देताना सांगितले की, ”पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या रेसमध्ये माझे नाव आघाडीवर होते. गेली दोन टर्म मी निवडून आलेलो आहे. त्यामळे सभापती पदाची उमेदवारी मलाच मिळणे क्रमप्राप्त असताना तसेच मी पक्षात जुना असतानाही मला डावलून केवळ पहिल्या वेळेस नगरसेवक झालेले विलास मडिगेरी यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
तसेच विलास मडिगेरी यांची स्थायीची मुदत एक वर्षाची असताना त्यांना स्थायीतून निवृत्त न करता कायम ठेवले आहे. पक्षाला असाच निर्णय घ्यायचा होता तर मागच्या वेळेसच मी राजीनामा दिला नसता. त्यामुळे पक्षाकडून माझ्यावर अन्याय झालेला आहे. त्याच्या निषेधार्थ मी बंडखोर म्हणून अर्ज दाखल केला आहे. माझ्या निर्णयाच्या समर्थनार्थ शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाने मला पाठींबा व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मला पाठींबा दर्शविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची तयारी देखील त्यांनी दर्शविली आहे. तसेच पक्षातल्या ४० टक्के नगरसेवकांचे मला समर्थन व पाठींबा आहे. पक्ष कारवाईस मी जुमानत नाही. मला सहकार्य असलेल्या भाजपच्या नगरसेवकांचा जाहीर पाठींबा येत्या ७ तारखेला सर्वांनाच दिसेल, असे शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.











