न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसेंबर २०२२) :- महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज गुरुवारी (दि. ८) पिंपरी चिंचवड शहरात राजकीय पक्षांसह विविध संस्था, संघटनांनी बंद पुकारला आहे. मा. खासदार संभाजी राजे भोसले हे दुपारी १२ वाजता पिपरी चौकात उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान सकाळी नऊ वाजता बंदला सुरुवात झाली असून चिखली, पिंपरी, निगडी, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, आकुर्डी परिसरात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठींबा दिल्याचे चित्र दिसत आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत शहरातील नागरिकांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
शहरासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय क्षेत्रात रविवारी (दि. ११) रात्री बारा वाजेपर्यंत जमाव बंदी आदेश लागू केला आहे. या आंदोलनाची दखल पोलिसांनी घेतली असून राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांना आधीच नोटीसादेखील पाठविल्या आहेत.















