न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसेंबर २०२२) :- घर, कंपनी, दुकानांवर सोलर पॅनेल उभा केले असून ते विजेच्या निर्मितीत स्वावलंबी बनले आहेत. दोन हजार पिंपरी-चिंचवडकरांची बिल न भरता लाईटमधून कमाई होत असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. दिवसेंदिवस सौर ऊर्जेचा वापर वाढल्याने अनेक वीज ग्राहकांची वीज बिलातून मुक्ती होत आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे विजेचा खप वाढतो आणि शिवाय विजेवरील खर्चात वाढ होते आहे. अशावेळी मोफत वीज मिळवणे आणि त्यातून कमाईदेखील करणे असे दोन्ही फायदे तुम्ही मिळवू शकता. तुम्ही आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावू शकता. यातून तुम्हाला मोफत वीज मिळेल. शिवाय हे सोलर पॅनल लावण्यासाठी सरकार साहाय्यदेखील करते. सौर ऊर्जेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार देशभरात सौर ऊर्जेला चालना देते आहे. यासाठीच केंद्र सरकारकडून सोलर रूफटॉप बसवण्यासाठी सबसिडीदेखील दिली जाते.
एखादी कंपनी अथवा वीजग्राहक सोलर पॅनेलमधून वीजनिर्मिती करतो, तो त्यांना आवश्यक तेवढी वीज वापरतो; मात्र शिल्लक वीज महावितरण कंपनीला विकतो. यासाठी एप्रिल ते एप्रिल या कालावधीची प्रक्रिया गृहित धरली आहे. महावितरण शक्यतो ३. १० किंवा ३.२० रुपये प्रति युनिटने वीज खरेदी करते अशी माहिती महावितरणने दिली.
सोलर प्रकल्प उभा करण्यासाठी पुणे शहर व जिल्ह्यातील सौर ऊर्जेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ग्राहक सौर ऊर्जा निर्मितीतून कमाई करीत असल्याचे दिसते आहे. अनेक वीज ग्राहकांनी वीज बिलातून मुक्ती मिळविली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी सौर ऊर्जेचा वापर करावा व स्वावलंबी बनावे.
– निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी…















