- पीडब्ल्यूडी मैदानाऐवजी पिंपरीतील एच. ए. ला पसंती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ डिसेंबर २०२२) :- शहरातील महिला बचत गट, वैयक्तिक महिलांनी तयार केलेल्या वस्तू, साहित्य व उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावे, तसेच महिलांना मार्केटिंग कौशल्ये ज्ञात व्हावीत, महिला उद्योजिका तयार होऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात म्हणून पवनाथडी जत्रेचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदा सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर जत्रा होणार आहे. मात्र, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला असून ही जत्रा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
याबाबत पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँगेसच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. पवनाथडी जत्रा सांगवी येथे न घेता पिंपरी येथील एच. ए. मैदानावर घ्यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पवनाथडी जत्रेला राजकीय वळण लागले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व साहित्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने दरवर्षी पवनाथडी जत्रा आयोजित केली जाते. कोरोना महामारीच्या पावणेतीन वर्षांच्या खंडानंतर ही जत्रा सांगवीतील पीडब्ल्यू मैदान येथे १६ ते २० डिसेंबर असे पाच दिवस आयोजित केली जाणार आहे. मात्र, ही जत्रा शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये घेण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
दरवर्षी सांगवी येथील मैदानावर पवनाथडी जत्रा घेतली जाते. हे मैदान शहराच्या एका कोपऱ्यात आहे. त्यामुळे भोसरी, मोशी, रावेत, चिंचवड या भागातील नागरिकांना या जत्रेचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे ही जत्रा शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये घेण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस…















